text: पुढच्या आठवड्यापासून लशीच्या वापराला सुरुवात केली जाणार आहे. फायजर बायोएनटेकने विकसित केलेली लस 95 टक्के संरक्षण देते त्यामुळे ही लस व्यापक वापरासाठी योग्य असल्याचं ब्रिटिश नियामक MHRA ने म्हटलं आहे. ज्या लोकांना सर्वाधिक गरज आहे त्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येईल असं सांगण्यात आले आहे. युकेने फायजरकडे 4 कोटी डोसेसची मागणी केलेली आहे. दोन कोटी लोकांना प्रत्येकी दोन शॉट्स दिले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. युकेमध्ये पुढच्या आठवड्यात मिळणार लस आपल्या लशीमुळे 95 टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळत असल्याचा दावा फायझर - बायोएनटेकने काही दिवसांपूर्वी केला होता. फायझर कंपनीने अमेरिकेमध्ये मंजुरी मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. चाचणी करण्यात आलेल्या लोकांपैकी 90% लोकांमध्ये कोव्हिडची लक्षणं निर्माण झाली नाहीत. या लशीचे दोन डोस तीन आठवड्याच्या अंतराने द्यावे लागतील. आतपर्यंत 43,000 लोकांवर या लशीची चाचणी करण्यात आली आणि त्यामध्ये लशीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हं निर्माण करणाऱ्या कोणत्याही गोष्टी आढळून आल्या नाहीत. ही लस -70 अंश सेल्शियस तापामानात साठवून ठेवावी लागेल. शिवाय ती एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना शुष्क बर्फात (Dry Ice) गुंडाळून एका विशिष्ट बॉक्समधून न्यावी लागेल. या बॉक्सवर जीपीएस ट्रॅकर लावलेला असेल. ही लस कसं काम करते? ही RNA प्रकारची लस आहे. यामध्ये व्हायरसच्या जेनेटिक कोडमधला एक विशिष्ट लहानसा भाग लस तयार करण्यासाठी वापरला जातो. ही लस टोचल्यानंतर शरीरातली रोग प्रतिकारशक्ती जागृत होते आणि या आणि यासारख्या पेशींवर हल्ला करते. यापूर्वी इतर कोणत्याही RNA प्रकारच्या लशींना माणसांसाठीच्या वापराची परवानगी मिळालेली नाही. पण इतर रोगांवर विकसित करण्यात आलेल्या RNA लशी काही ट्रायल्सदरम्यान लोकांना देण्यात आल्या होत्या. फायझर आणि बायोNटेक या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीची अमेरिका, जर्मनी, ब्राझील, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की या 6 देशांतल्या 43,500 लोकांवर चाचणी घेण्यात येतेय. या लोकांना 3 आठवड्यांच्या अंतराने या लशीचे 2 डोस देण्यात आले. दुसरा डोस घेतल्यानंतर सात दिवसांमध्ये 90% संरक्षण मिळाल्याचं यामध्ये आढळलं. शिवाय यापैकी कोणामध्येही लशीच्या सुरक्षिततेविषयीची कोणतीही काळजीची बाब आढळली नाही. आपल्याला लशींची गरज का आहे? कोव्हिड-19 मुळे थांबलेलं जनजीवन पूर्ववत सुरू करण्यासाठी आपल्याला लशींची गरज आहे. सद्य स्थितीतही जगभरात मोठ्या संख्येने लोक कोव्हिड-19 च्या संसर्गाला बळी पडण्याची शक्यता आहे. कोव्हिड-19 विरोधातील लढ्यात प्रत्येक व्यक्तीने आपल्यावर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत. या बंधनांमुळेच आपण कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंवर प्रतिबंध घालू शकलो आहोत. लस आल्यावर सर्व गोष्टी सुरळीतपणे चालतील अशी वैज्ञानिकांना आशा आहे. हेही वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.) फायजरने तयार केलेल्या कोरोनावरील लसीचा वापर सर्वसामान्यांवर व्यापक प्रमाणात करण्याची परवानगी युनायटेड किंगडममध्ये देण्यात आली आहे. लसीच्या व्यापक वापराला परवानगी देणारा युके हा पहिला देश ठरला आहे.